महेश पाळणे , लातूरजगातील ११८ देशांत खेळल्या जाणाऱ्या पेटन्क्यू खेळाचा समावेश शालेय स्पर्धेत झाला असला, तरी या स्पर्धा केवळ राज्यस्तरापर्यंतच होतात. राष्ट्रीय स्पर्धेत शालेय खेळाडूंना या खेळात कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी राज्य संघटना प्रयत्न करणार असल्याचे राज्य पेटन्क्यू संघटनेचे सचिव प्रदीप साखरे यांनी सांगितले. राज्यस्तरीय शालेय पेटन्क्यू स्पर्धेसाठी साखरे लातुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, फ्रान्समध्ये सुरुवात झालेला हा खेळ ११८ देशांत खेळला जातो. चेस, शुटिंग व कॅरम या तिन्ही खेळांचा संगम या खेळात आहे. या खेळामुळे खांदे मजबूत होतात. यासह एकाग्रता व बौद्धिक क्षमताही वाढीस लागते. कमी खर्च व अल्प जागेत या खेळाचे मैदान होऊ शकते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेत हा खेळ प्रचलित होत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक संघटनेमार्फत या खेळाचा प्रचार व प्रसार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याने तीन महिन्यातून एकदा जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. संघटना व प्रायोजक बघून यातील विजेत्यांना आर्थिक पाठबळही देण्याचा विचार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रयत्न चालू असून, पहिली स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याचा आमचा मानस आहे. आशियाई स्पर्धा, बीचएशियन व इंडोएशियन आदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा या खेळाच्या होतात. २०२४ च्या आॅलिम्पिकमध्येही हा खेळ येणार आहे. यासह आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रात या खेळाची लिग स्पर्धा आम्ही घेणार आहोत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असलेले साखरे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू उत्तम कामगिरी करतात व महाराष्ट्राच्याच खेळाडूंना अधिक पदके असतात, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी प्रयत्न करणार
By admin | Published: February 23, 2016 12:37 AM