औरंगाबाद : जालना येथील उत्तरपत्रिका पुनर्लेखन प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरारच आहे. तो जालना येथील बड्या राजकीय पुढाऱ्याचा जवळचा नातेवाईक असून, त्याला वाचविण्यासाठी शासनाने हे प्रकरण चव्हाट्यावर आणणारे जालना येथील सहायक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना पदोन्नती देऊन त्यांची अंबाजोगाई येथे बदली केली आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती आंदोलनाच्या तयारीत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन प्रकरण जालना पोलिसांनी चव्हाट्यावर आणले होते. या प्रकरणात औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळातील सात ते आठ कर्मचारी तसेच काही महाविद्यालयीन प्राध्यापक अटकेत आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पिशोर येथील महाविद्यालयाचा प्राचार्य ज्ञानेश्वर चव्हाण हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो पोलिसांच्या ताब्यात आला, तर या प्रकरणाची पाळेमुळे उघडकीस येतील; पण त्याला वाचविण्यासाठी शासनावर दबाव आणून सहायक पोलीस अधीक्षक गेडाम यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांना तेथून अंबाजोगाईला पाठविण्याचा घाट काही राजकारण्यांनी रचला आहे, असा आरोप शिक्षण बचाव कृती समितीने केला आहे. सहायक पोलीस अधीक्षक गेडाम यांची बदली केली असती, तर ओरड झाली असती म्हणून त्यांना पदोन्नतीने तेथून पाठविले जात आहे, असे कृती समितीचे म्हणणे आहे.
उत्तरपत्रिका घोटाळ्याला बगल देण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 24, 2016 11:29 PM