लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरात एका संशयिताने शनिवारी मध्यरात्री मालवाहू ट्रक, एका शाळेचे कार्यालय व लॉटरीच्या दुकानास आग लावली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या माथेफिरुचा पोलीस शोध घेत आहेत.परतूर शहरात माथेफिरुने आनंद माध्यमिक विद्यालयातील कार्यालयाच्या दरवाजास आग लावली. त्यामुळे कार्यालयातील शालेय साहित्य जाळले. त्याचबरोबर विश्रामगृहासमोरील एका लॉटरीच्या दुकानास आग लावून संगणक व लॉटरीचे साहित्य जाळून टाकले. त्यानंतर संशयिताने आपला मोर्चा मोंढा भागातील केदार खंडेलवाल यांच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयाकडे वळविला. कार्यालयाबाहेर उभा असलेला मालाने भरलेला ट्रक पेटवून दिल्यामुळे साहित्य जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले. परतूर शहरात प्रथमच अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आनंद विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयिताच्या हालचाली कैद झाल्या आहेत. हे कृत्य एकाच व्यक्तीने केले की इतरही सोबत होते, याचा पोलिस शोध घेत आहेत. आसाराम शाहूराव मुजमुले यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार मनोहर दुसाने तपास करत आहेत.
माथेफिरुचा दुकानांना आग लावण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 19, 2017 12:12 AM