औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २६ जून रोजी औरंगाबादेत मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी पडेगाव भागात बैठक सुरू असताना तडीपार गावगुंडांच्या माध्यमातून सरकारने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यातून आमचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न सुरू आहे. आम्ही असल्या गावगुंडाच्या दबावाला घाबरणारे नसून, त्यास चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसंग्रमाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिवसंग्रामतर्फे आयोजित केलेल्या मोर्चाच्या नियोजनासाठी पडेगाव येथे आमदार मेटे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सरकारच्या गावगुंडानी येत गोंधळ घातला. यावेळी शिवसंग्रामचे शहराध्यक्ष उमाकांत मखाने यांचा मुलगा डॉ. अभिमन्यू मखाने यांनाही मारहाण केली. हा कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्वनियोजित गोंधळ होता, असा आरोपही आमदार मेटे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे सरकार हे पक्षात गुंड व तडीपार लोकांच्या माध्यमातून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यासाठी जेवढे प्रयत्न कराल त्यापेक्षा अधिक संख्येने समाज उसळणार आहे. ज्यांनी गोंधळ घातला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर टाकला आहे.
मागील २५ वर्षांपासून मुंबईबाहेर असल्यानंतर दिले जाणारे संरक्षण नुकतेच काढून घेतले आहे. त्यामुळे माझ्यासोबत काही गैरप्रकार झाल्यास त्यास राज्य शासनच जबाबदार असेल, असेही आमदार मेटे म्हणाले.