वाळूज महानगर : पतीसोबत वाद झाल्याने मैत्रिणीकडे आश्रयासाठी जाणे एका २५ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. मैत्रिणीने साथीदाराच्या मदतीने तिला दोन दिवस डांबून ठेवत वयस्क इसमासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उद्योगनगरीत उघडकीस आली आहे.
पीडित सोनम (नाव बदलले आहे) ही महिला कुटुंबीयांसमवेत वाळूज उद्योगनगरीत वास्तव्यास आहे. दि. २२ मे रोजी सोनम हिचा पतीसोबत वाद झाल्याने ती जोगेश्वरीत वास्तव्यास असणारी मैत्रिण मुस्कान शेख हिच्या घरी आश्रयासाठी गेली होती. रात्रभर मुस्कान हिच्या घरी आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनम हिस मुस्कान हिने तुझा नवरा तुला घरात घेणार नाही. आपण घरी राहिल्यावर बोअर होऊ, आपण दोघी चितेगावला मैत्रिणीकडे जाऊ, अशी थाप मारली होती. यानंतर मुस्कान हिने रिक्षा किरायाने घेऊन सोनमला चितेगावला नेले. चितेगावला गेल्यानंतर एका घराचे कुलूप उघडून मुस्कान व सोनम त्या घरात गेल्या. काही वेळाने मुस्कान हिची आई मुन्नी शेख व तिचा मित्र शहारूख सय्यद हे दोघे चितेगावला पोहोचले. तिघांनी सोनम हिस तुझे शाम नरवडे या श्रीमंत व्यक्तीबरोबर लग्न लावणार असल्याचे सांगत, तो तुला सुखात ठेवेल, असे सांगितले.
मात्र, सोनम हिने लग्न करण्यास विरोध केल्याने मुस्कान शेख, मुन्नी शेख व शहारूख सय्यद यांनी तिला घराबाहेर जाऊ न देता दोन दिवस घरातच डांबून ठेवले. नंतर बायपास रोडवरील एका दुमजली इमारतीत घेऊन गेले. वयस्क इसमासोबत तुला लग्न करायचे आहे, असे सोनमला सांगितले. मात्र, वयस्क इसमाने मुलगी लग्नास तयार नसल्याने दुसरी मुलगी लग्नासाठी आणा, असे सांगितले. नंतर सोनमला चितेगावला आणले. चितेगावला सोनमला डांबून ठेवल्यानंतर तिथे पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून तिला तिघांनी घाणेगावला आणले. तिथून तिने शिताफीने पळ काढला. एका माणसाच्या फोनवरून पतीशी संपर्क साधला. त्याने रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घाणेगावला जाऊन पत्नीला सोडवले. याप्रकरणी पीडित सोनम हिच्या तक्रारीवरून मुस्कान शेख, मुन्नी शेख व शहारूख सय्यद या तिघांविरूद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक गणेश ताठे हे करीत आहेत.