औरंगाबाद : आमखास मैदान येथील जिल्हा नेत्र रुग्णालयाची पत्र्याच्या शेडमधील बाह्यरुग्ण विभाग आणि स्लॅबचे चार हॉल रिकामे पाहून सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त तुकाराम मुंडे संतापले. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांला तीन दिवस भरती ठेवणे, प्रिस्क्रिप्शन आणि नोंदी व्यवस्थित का नाही असा जाब विचारत अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली. बीडमध्ये तेच सांगावे लागले इथेही तेच सांगावे लागतेय म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तीन वेळा दौरा रद्द झाल्यावर अखेर चौथ्यांदा सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त तुकाराम मुंडे अखेर शहरात आले. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह त्यांनी आमखास परिसरातील जिल्हा नेत्ररूग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, नेत्रचिकित्सक डॉ. संतोष काळे अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ महेश वैष्णव यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. रुग्णांशी संवाद साधत जेवण काय मिळाले? चहा मिळाला का? ऑपरेशन कधी आहे? याची विचारणा केली. रुग्णांना ऑपरेशन कधी याची कल्पना नसल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा मुंडे संतापले. नेत्र ओपीडी मुख्य इमारतीत स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आमखास परिसरात असलेल्या नेत्र रुग्णालयाची पाहणी करत कर्करोग रुग्णालयाच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणासाठी नेत्र रुग्णालयाची जागा आवश्यक असल्याबद्दल पुढील विस्तारीकरणाची अधिष्ठाता डॉ रोटे यांनी माहिती दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांच्या जागेची त्यांनी पाहणी करून मुंडे जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पोहचले.