औरंगाबाद : निसर्गदिप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, चित्ते पिंपळगाव येथील श्री तुळजाभवानी कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे सलग्नीकरण रद्द करून पुर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव विद्या परिषदेत सोमवारी मंजूर झाला. कार्यकारणी मंडळातील वाद, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि पायाभूत सोयीसुविधा नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
औरंगाबाद तालुक्यातील चित्ते पिंपळगाव येथे असलेल्या या महाविद्यालयाच्या कार्यकारणी मंडळात सतत तक्रारी, वाद होत होते. त्यासंबंधी एकमेकांविरूद्ध तक्रारी, विद्यार्थ्यांची तक्रारींमुळे विज्ञान व कुलगुरुंनी नेमलेल्या तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डाॅ. बी. बी. वायकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तपासणी अंती अहवाल सादर केला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम (मसाविअ) २०१६ कलम १०८ नुसार पायाभुत सुविधा उपलब्ध नसल्याने अधिष्ठाता मंडळाने ७ जुलै रोजी धोरणात्मक निर्णया घेत मसाविअ २०१६ कलम १२० १ ते ४ नुसार या महाविद्यालयाचे सलग्नीकरण २०२२-२३ पासून संपुर्णत: रद्द करण्याचा प्रस्ताव विद्यापरिषदेत मंजुर करण्यात आला. या महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना इच्छित महाविद्यालय अधिष्ठाता मंडळाने शिफारस केलेल्या वर्गात वर्ग करण्यात येतील. तसेच महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला असल्याची माहीती कुलगुरूंनी दिली.