विजय सरवदे
औरंगाबाद : ‘अनलॉक’नंतर आता परप्रांतीय मजूर टप्प्याटप्प्याने समृद्धी महामार्गाच्या कामावर परत येऊ लागले असून बोगदा, इंटरचेंज, अंडरपास व रस्त्याच्या कामाने हळूहळू गती घेतली आहे. दरम्यान, येत्या दोन- अडीच महिन्यांत बोगद्याच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी सज्ज होतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाचे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा ‘सुपर फास्ट एक्स्प्रेस वे’ अर्थात बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जात आहे. लॉकडाऊनमुळे मागील १४ महिन्यांपासून या रस्त्याचे काम प्रभावित झाले होते. अनेक परप्रांतीय मजूर गावी गेले, तर अलीकडे शासनाने रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे महामार्गाची अनेक कामे खोळंबली होती.
या सहा पदरी महामार्गावर रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून माळीवाडा आणि सावंगी इंटरचेंज, तर लासूर स्टेशनजवळ रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे. औरंगाबाद तालुक्यातील पोखरी शिवारात बोगदा (भुयारी मार्ग) उभारला जात आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूंसाठी सावंगी इंटरचेंजच्या पूर्वेला पोखरी शिवारात डोंगर कोरण्यात आला असून डिसेंबर २०२० मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. या कामासाठी 'एमएसआरडीसी'ने कंत्रादार कंपनीला ९० दिवसांची मुदत दिली होती; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आणि कामाची गती मंदावली. कामावरील परप्रांतीय मजुरांचा मोठा गट होळीच्या सणासाठी गेला. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. त्यामुळे ते मजूर परत आलेच नाहीत. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यांतही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर गावी गेले. कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गती मंदावली. सध्या ‘अनलॉक’ झाले असले, तरी रेल्वेसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे कंत्राटदार संस्थांनी स्वखर्चाने बस पाठवून मजुरांना आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या बोगद्याच्या आतील बाजूचे मजबुतीकरणाचे (लाईनींग) काम हाती घेण्यात आले आहे. दोन्ही बाजूचे मजबुतीकरण पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चौकट......................................
जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा महामार्ग
एकूण १२० मीटर रुंदीचा हा रस्ता ६ पदरी असेल
पोखरी शिवारात २९० मीटर लांबीचा बोगदा
सावंगी, माळीवाडा, शेंद्रा एमआयडीसी, हडस पिंपळगाव, जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज
प्राण्यांसाठी २ ठिकाणी ओव्हरपास, तर ३ ठिकाणी अंडरपास
महामार्गालगतच्या गावांमधील पादचाऱ्यांसाठी, वाहनांसाठी व प्राण्यांसाठी एकूण २२० अंडरपास
जिल्ह्यातून औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील ७१ गावांमधून गेेला समृद्धी महामार्ग