औरंगाबाद : नवीन तूर बाजारात येताच डाळींचे भाव कमी होतात, असा दरवर्षीचा अनुभव; मात्र यंदा नवीन तुरीची आवक सुरू झाली असतानाही डाळींचे भाव मात्र कडाडले आहेत. मागील आठवड्यात ५०० रुपयांनी भाववाढ होऊन तूर डाळ ६६०० रुपये क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तुरीच्या कमी उत्पादनामुळे भाववाढीच्या भडक्याला आणखी हवा मिळाली आहे.
दुष्काळी भागात प्रामुख्याने खरिपात तूर पीक घेण्याकडे मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात ४० हजार ५८७ हेक्टरवर तुरीची लागवड होते; मात्र यंदा अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांनी तूर लागवडीत हात आखडता घेतला. परिणामी, ३० हजार ८८३ हेक्टरवरच तुरीची लागवड झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. परतीचा पाऊस पडलाच नसल्याने तूर पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे.
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तुरीची तुरळक आवक सुरू झाली आहे. बुधवारी ३० पोती तूर विक्रीसाठी आली. ५००० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल दराने नवीन तूर खरेदी केली जात आहे. राज्य शासनाने हमीभाव ५५०० रुपये घोषित केला आहे. अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, तुरीचे उत्पादन ६० ते ७० टक्के कमी आहे. सध्या तुरळक आवक सुरू झाली असून, यंदा उत्पादनातील घट लक्षात घेता पुढील महिनाभर हंगाम सुरू राहील, असे वाटते. डाळीच्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, नवीन तुरीचे उत्पादन कमी असल्याने मिलवाल्यांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.
मागील आठ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे ५०० रुपयांनी वधारली. आज ६२०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल तूर डाळ विकत आहे. २०१५ यावर्षी तूर डाळ १८० ते २२० रुपये किलोपर्यंत उच्चांकी भावात विकली होती. सध्या किरकोळ विक्रीत ७५ रुपये किलोपर्यंत डाळ विकत आहे.
शेतकऱ्यांना तुरीचा हमीभाव मिळेना सरकारने नवीन तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला आहे. यंदा दुष्काळामुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले असतानाही बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणे अपेक्षित होते. बाजारात शेतकऱ्यांकडून तूर ५२०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलच खरेदी केली जात आहे. म्हणजे क्विंटलमागे अजूनही ३७५ ते ४७५ रुपये कमी भाव दिला जात आहे. यासंदर्भात अडत व्यापारी कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, एफएक्यू गुणवत्तेची तूर मिळाली तरच सरकार हमीभाव देते; मात्र यंदा पाणी कमी पडल्याने तुरीची गुणवत्ता घसरली आहे. दाणे बारीक पडले आहेत. हिरवट दाण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच मुकनीचे प्रमाण अधिक असल्याने तुरीला हमीभाव देणे परवडत नाही, अशी तूर सरकारही खरेदी करणार नाही.
सरकारी तिजोरीला फटका दुसरीकडे मागील वर्षी सरकारने ५२५० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली होती. तीच तूर सरकारने डाळ मिलवाल्यांना व बड्या व्यापाऱ्यांना ३५०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलने विकली. यात सरकारला क्विंटलमागे १५५० ते १७५० रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. याच जुन्या तुरीची डाळ करून मिलवाले आज ४५०० ते ४७०० रुपये क्विंटल विकत आहेत.
चार महिन्यांत डाळींच्या दरात झालेली वाढडाळ आॅगस्ट २०१८ नोव्हेंबर २०१८तूर डाळ ५१०० ते ५३०० रु. ६२०० ते ६६०० रु.उडीद डाळ ३७०० ते ४००० रु. ५८०० ते ६५०० रु.हरभरा डाळ ४७०० ते ५००० रु. ५७०० ते ६१०० रु.मूग डाळ ६००० ते ६३०० रु. ६८०० ते ७३०० रु.मसूर डाळ ४५०० ते ४७५० रु. ५००० ते ५३०० रु.