कंधार : निसर्गाने संकटाची मालिका थांबविण्यासाठी न चा पाढा सुरू केला आहे़ ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हळद काढणीला ब्रेक लागला आहे़ काढलेली हळद घरी येण्याची शंका निर्माण करणारी ठरत आहे़ त्यातच रसाळ-मधाळ आंबा कैरी वादळ वाऱ्याने झडून जात असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाशी सामना करण्याचा प्रसंग आला आहे़ पावसाअभावी खरीप, रबी गेले़ आता हळद-आंबा हा अवकाळी पावसाने जाण्याची भीती निर्माण झाली आहे़तालुक्यात जून अखेरपर्यंतच्या पेरणी अहवालानुसार हळद ५८३़२० हे़वर लागवड करण्यात आली होती़ त्यात कंधार महसूल मंडळांतर्गत गावात १६७़२० हेक्टरचा समावेश आहे़ सर्वाधिक लागवड बाचोटीत ३८ हे़, चिखलभोसी- २१ हे़, मजरे धर्मापुरी-१७, नवघरवाडी-१४, पानभोसी-१३, गोगदरी-१४, चिंचोली-१० हे़ आदी गावांचा समावेश आहे़ कुरुळा महसूल मंडळांतर्गत असलेल्या गावात अवघी १४ हे़ लागवड करण्यात आली़ फुलवळ महसूल मंडळांतर्गत असलेल्या गावात ७५ हे़, मुंडेवाडी १५ हे़, कंधारेवाडी-५, फुलवळ-७, गऊळ-१०, पानभोसी-१२, शेकापूर-६, तळ्याचीवाडी-३, संगमवाडी-५ हे़ आदी गावांचा समावेश आहे़उस्माननगर महसूल मंडळांतर्गत असलेल्या गावांत १३२ हे़ ची लागवड करण्यात आली़ बारूळ महसूल मंडळांतर्गत गावात १५१ हे़ लागवड होती़ सर्वात अत्यल्प पर्जन्यमानाचा फटका पेठवडज महसूल मंडळाला बसला़ त्यामुळे अवघी ४४ हे़ लागवड हळदीची झाली़ खरीप, रबी पिकापेक्षा नावीन्यपूर्ण पिके घेवून उत्पन्नवाढीकडेही शेतकऱ्यांचा कल राहत आला आहे़ परंतु निसर्गाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे गत ३ वर्षातील भयावह चित्र आहे़ खरीपाने दगा दिला़ हळद लागवड केली तरी अखेरपर्यंत जलस्त्रोत व जलसाठे साथ दिली नाही़ त्यामुळे अनेकांची हळद करपून गेली़ अनेकांनी हळद जगविण्यासाठी आटापिटा केला़ आता अनेक शेतकरी काढण्याच्या तयारीत असताना अवकाळी पावसाने दोनदा हजेरी लावल्याने जमिनीत असलेली हळद काढण्याची शेतकऱ्यांना हिंमत होत नाही़ कारण काढलेली हळद पाण्यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत़ मग वातावरणातील बदलाने हळद काढणी न केलेली बरी असा सूर उमटत आहे़( वार्ताहर)
हळदीवर अवकळा
By admin | Published: March 01, 2016 11:42 PM