सिल्लोड : तालुक्यातील जलसाठ्यांची पाहणी करून तलावांमधील अवैध व शेतीसाठी करण्यात येणारा पाणी उपसा तात्काळ ब्ांद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे राखीव करावेत, असे आदेश पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांना तात्काळ विहिरींचे अधिग्रहण व मागणीनुसार टँकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. येथील तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीटंचाई, चारा टंचाई व मग्रारोहयोच्या कामांविषयी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी मनोज चौधर, तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव, महावितरणचे सहायक अभियंता अरुण गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मधुसूदन कांडलीकर, सिंचनचे अभियंता दत्तात्रय गवळे, जि.प. पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता डोंगरे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वानखेडे, पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सभापती रेखा जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेशराव दौड, शहराध्यक्ष प्रा.मन्सुर कादरी, उपनगराध्यक्ष किरण पवार, न.प.चे गटनेता नंदकिशोर सहारे, जि.प.सदस्य श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, बाबुराव चोपडे, कौतिकराव मोरे, बाजार समितीचे संचालक केशवराव तायडे, देवीदास लोखंडे, सुनील काकडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दुर्गाबाई पवार, शहराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील पाणीटंचाईचा गावनिहाय आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या गावांमध्ये दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशा गावांतील सरपंच, ग्रामसेवक यांना तात्काळ राष्ट्रीय पेयजलअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तालुक्यात केटीवेअरला लोखंडी दरवाजे बसविण्याच्या सूचनाही त्यांनी सिंचन विभागाला दिल्या. जळालेले रोहित्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश महावितरण अभियंत्यांना दिले. अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना अब्दुल सत्तार यांनी यावेळी केल्या. फेरपंचनामे करण्याचे आदेश गारपिटीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे तलाठी व कृषी सहायकांनी फेरपंचनामे करावेत, असे आदेश अब्दुल सत्तार यांनी यावेळी बैठकीत दिले. (वार्ताहर)ग्रा.पं.त बायोमेट्रिक मशीनआढावा बैठकीत ग्रामसेवक आठवड्यातून एक-दोन दिवस येतात, यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांनी केल्या. या मुद्यावरून ग्रामसेवक व नागरिक यांच्यामध्ये चांगलाच आमना-सामना झाला. ग्रामसेवक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांची ग्रामपंचायतमधील उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लवकरच बायोमेट्रिक थंब मशीन बसविणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. बैठकीला तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाण्याचा अवैध उपसा बंद करा
By admin | Published: June 29, 2014 12:47 AM