सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार आणि डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दामूअण्णा दाते सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. मयुरी राजहंस यांना डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार, तर पार्वती दत्ता यांना डाॅ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार रवींद्र किरकोळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्योजक मिलिंद केळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. दिवाकर कुलकर्णी यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रवींद्र किरकोळे म्हणाले की, शुद्ध आणि समावेशी भारतीयत्व दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्यातून दिसून येत आहे. शुद्ध भारतीयत्व म्हणजे नेमके काय, याचाही विचार होऊन मूल्य व्यवस्थेवर कायम राहणे आणि नव्या पिढीला रुचेल त्या शब्दांत ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. सेवा आणि प्रबोधन ही आपण दिलेली नावे असून प्रबोधन ही दीर्घकाळ परिणाम करणारी सेवा, तर सेवा म्हणजे दीर्घकालीन प्रबोधनच आहे. आजचा समाज मोकळा, प्रगल्भ, रूढीमुक्त, अमानवी परंपरांपासून दूर झाला आहे, याचे श्रेय मनात फलप्राप्तीची अपेक्षा न ठेवता अविरतपणे काम करणाऱ्या अनेक ज्ञान- अज्ञात समाजभक्तांचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजाच्या जडणघडणीत पायाभूत सुविधा, शिक्षण देण्याचे काम सरकारचे आहे; पण नव्या पिढीत मूल्ये रुजविण्याचे काम समाजाचेच आहे, अशा शब्दांत केळकर यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले. डाॅ. सई पाटील यांनी आभार मानले. सिद्धार्थ पटेकर यांनी गीत सादर केले. संकेत कुलकर्णी, योगिता होके यांनी सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन केले.
चौकट :
सत्कारमूर्तींचे मनोगत
कठीण परिस्थितीतही आपली कला जोपासणाऱ्या कलावंतांना हा पुरस्कार समर्पित करत आहे, अशा भावना पार्वती दत्ता यांनी मांडल्या, तर या पुरस्काराने आता आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे, याची जाणीव झाल्याचे मयुरी यांनी सांगितले.
फोटो ओळ :
डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार स्वीकारताना मयुरी राजहंस, तर डाॅ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार स्वीकारताना नृत्यांगना पार्वती दत्ता.