विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणे गरजेचे आहे. विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसात झाडांखाली थांबणे धोकादायक ठरते आहे. यंदाचा पावसाळा जोरदार असेल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे, त्यानुसार १५ जुलैपर्यंत जिल्ह्यांत बऱ्यापैकी पावसाची नोंदही झाली आहे. जिल्ह्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. जिल्ह्यात वीज अटकाव करणारी जास्तीची यंत्रे असावीत, अशी मागणी आहे. ४० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ७ लाख हेक्टरवर पिकांचे क्षेत्र आहे. या सगळ्या परिसरासाठी फक्त चार वीज अटकाव यंत्रे आहेत.
जिल्ह्यात किती वीज अटकाव यंत्रे
औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत १५ ते १८ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. हनुमंतगाव वैजापूर, नवगांव पैठण, गोलटगांव, औरंगाबाद, मुर्डेश्वर- सिल्लोड या ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रे आहेत.
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी
शेतात काम करणाऱ्यांनी जवळील सुरक्षित ठिकाणाचा त्वरित आसरा घ्यावा. आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
- अजय चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
वीज कडाडत असताना या गोष्टी टाळा
मोबाईल वापरू नका. खुल्या मैदानात, झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका. विजेचा, टेलिफोनचा खांब, मोबाईल टॉवर जवळ उभे राहू नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावरून उतरून सुरक्षित ठिकाणी जा. वाहनातून प्रवास करू नका. मोबाईलसह कोणत्या धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
कोणाला किती नुकसान भरपाई मिळते
वीज पडून दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना व जनावरांना १३ मे २०१५ शासन आदेशातील अटी व शर्तीनुसार नुकसान भरपाई देण्यात येते.
वीज पडून मृत्यू झाल्यास : चार लाख रुपये
४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास : ५९ हजार रुपये
६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये
आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात असल्यास : ४३०० रुपये
आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्णालयात असल्यास : १२ हजार ७०० रुपये
जनावरांना मृत्यूनंतर लहान व मोठे असे वर्गीकरण करून मदत देण्यात येते.