उस्मानाबाद : ऐकीकडे जिल्ह्यातील सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीची तयारी चालली असतानाच दुसरीकडे मात्र, निवडणुकीसाठी लागणारा खर्च पेलण्याचीही कुवत नसल्याने तब्बल दोनशेवर सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया अडचणीत सापडली आहे. हा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उभा ठाकला आहे. जिल्हाभरातील सहाकारी संस्था, सोसायट्या आणि पतसंस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त होताच प्रशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ‘ब’ वर्गातील सहाकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यानुसार सात संस्थांचा निवडणूक कार्यक्रमही तयार करण्यात आला आहे. सहकारी संस्थांसोबतच सोसायट्यांची निवडणूकही घेतली जाणार आहे. संबंधित कार्यालयाकडून या सोसायट्यांना नोटिसा देवून मतदार याद्या तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. परंतु, या सस्थांकडून अद्याप मतदार याद्याच तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्याला कारणही तसेच आहे. जिल्हा बँक मागील काही वर्षांपासून चलन तुटवड्याचा सामना करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, ठेवीदार अडचणीत आले आहेत. वारंवार चकरा मारूनही त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. चलनतुटवड्याचा फटका आता सोसायट्यांच्या निवडणुकीलाही बसताना दिसत आहे. संस्थांचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी खर्च करायचा कोठून? असा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. पैसेच नसल्याने मतदार यादी तयार करण्याची कामेही उरकलेली नाहीत, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनही आता चांगलेच पेचात सापडले आहे. (प्रतिनिधी)४संचालक मंडळाचा कार्यकाळ सरलेल्या सर्वच संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सात सहकारी संस्थांची निवडणूक होणार असून तसा कार्यक्रमही तयार करण्यात आला आहे. यामध्ये तेरणा सहकारी बँक (२१५५), जनता बँक कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्था उसमानाबाद (३१९), तुळजाई नागरी सहकारी पत संस्था तुळजापूर खु. (४४८), तांत्रिक वीज कामगार सहकारी पतसंस्था (४७८), समर्थ सहाकारी ग्राहक भांडार (१३०१), महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था (१२७५) तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वर्कस फेडरेशन को. आॅफ क्रे. सोसायटीचा (२९७) समावेश आहे. (कंसातील आकडे मतदार संख्या दर्शवितात).४जिल्हा बँकेतील चलन तुटवड्याचा परिणाम सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीवर होत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी सोसायट्यांकडे नाही. त्यामुळे मतदार याद्या बनविण्यातही अडचणी येत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरण पुणे यांना पत्र पाठवून याबाबत मार्गदर्शन मागविण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक बडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यामध्ये ‘ब’ वर्ग सेवा सोसाट्यांची संख्या ७७ इतकी आहे. तर १२१ इतक्या ‘क’ वर्गातील सोसायट्या आहेत. या सर्व संस्थांना नोटिसा देवून निवडणूक प्रक्रियेची तयारी करण्याबाबत कळविले होते. परंतु, काही महिन्यांचा कालावधी लोटूनही यांच्या मतदार याद्या तयार झालेल्या नाहीत. त्यासाठी लागणारा निधीच संस्थांकडे नसल्याने खर्च करायचा कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोनशेवर सोसायट्यांची निवडणूक अडचणीत !
By admin | Published: January 02, 2015 12:38 AM