औरंगाबाद : जिल्ह्यात कुक्कुटपालन केंद्र (पोल्ट्री फार्म)मधून होणारी सुमारे तीन कोटींची उलाढाल बर्ड फ्लूमुळे धोक्यात आली आहे. बाहेरून येणारी आयात तूर्तास बंद असून, जिल्ह्यातूनही बाहेर माल पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे व्यवसायासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात कुठल्याही गावामध्ये कोंबड्या, कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणारे पक्षी मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे आढळलेले नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. प्रशांत चौधरी यांनी सांगितले. तालुकानिहाय कोंबड्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. चार ठिकाणचे नमुने निगेटिव्ह आले असून, कन्नडमधील नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. त्याचा अहवाल आल्यानंतर परिस्थिती समोर येईल. जिल्ह्यात सध्या दहा लाखांच्या आसपास पक्षी आहेत. लेअर, बॉयलरचा त्या पक्ष्यांत समावेश आहे. जिल्ह्यात पोल्ट्री फार्म व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होते. नवापूरमधून औरंगाबादमध्ये वाहतूक होण्याचा सध्या संबंध नाही. परभणीतून पोल्ट्री फार्मची वाहतूक सध्या बंद आहे, असे त्यांनी सांगितले. जायकवाडी, नांदुर मधमेश्वर यांसारखी मोठी धरणे, तलाव, इतर ठिकाणी किंवा स्थलांतरित पक्ष्यांचे असाधारण मृत्यू झाल्याचे आढळलेले नाही.
पोल्ट्री व्यवसायावर परिणाम
जिल्ह्यात पाच हजार कोंबड्या असलेले २५०, तर त्यापेक्षा कमी कोंबड्या असलेले २०० पोल्ट्री फार्म असून, त्या फार्मचा सर्व्हे करण्यात आला आहे. औरंगाबादमधून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची वाहतूक होते. नाशिक ते मुंबईपर्यंत येथून माल जातो. जालना आणि अहमदनगरमध्ये अद्याप बर्ड फ्लूचा संसर्ग असलेले पक्षी आढळून आलेले नाहीत. त्यामुळे सध्या औरंगाबाद सुरक्षित असले तरी पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाला आहे.