पाच दिवसांची विश्रांती : निम्मे कंत्राटी कामगार न परतल्याने ठेकेदाराची डोकेदुखी वाढलीवाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.
वाळूज उद्योगनगरीतील बहुतांश कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळीसाठी पाच दिवसांची सुटी देण्यात आली होती. बहुतांश कामगार ७ नोव्हेंबरपासून मुळगावी गेले होते. कामगार रविवारपासून उद्योगनगरीत परतण्यास सुरवात झाली होती. सोमवारपासून उद्योगनगरीत कारखाने सुरु झाले असून, बहुतांश कायमस्वरुपी कामगार कामावर हजर झाले. मात्र, ५० टक्के कंत्राटी कामगार कामावर न आल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. उद्योगनगरीत १ लाखाच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना मर्यादित सुट्या असल्यामुळे तसेच एकदा कामावर हजर झाल्यानंतर लवकर सुट्या मिळत नसल्यामुळे हे कामगार उशिराने कामावर परत येत असल्याचा अनुभव उद्योजक मंडळीना असतो.
दिवाळीत बहुतांश कंत्राटी कामगार कामावर लवकर परत येत नसल्यामुळे लघु उद्योजक दसऱ्यानंतर वर्क आॅर्डरचे काम करुन मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या मटेरियल व साहित्याचा स्टॉक करुन ठेवतात. यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे मटेरियल चार ते पाच दिवस पुरेल अशी तजवीज लघु उद्योजकांनी केलेली असते. मात्र, कंत्राटी कामगार उशिरा कामावर परत आल्यास उत्पादन प्रकिया मंदावण्याची भिती दिंगबर मुळे, राहुल मोगले, अनिल पाटील, मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड, अर्जुन आदमाने, डॉ. शिवाजीराव कान्हेरे या लघु उद्योजकांनी वर्तविली आहे.
कामगार पुरविणारे ठेकेदार त्रस्तकामगारांची चणचण भासत असल्यामुळे उद्योजकाकडून ठेकेदारांना कामगार पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे ठेकेदार व सुपरवायझरकडून गावी गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना लवकर कामावर हजर होण्यासाठी विनवणी केली जात असल्याचे काही ठेकेदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गावी गेलेले कामगार लवकरच परत येतील, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.