औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली असून, गुरुवारी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी अर्ज घेऊन इच्छुकांच्या यादीत स्थान मिळविताच शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते किशोर शितोळे आणि पंकजा मुंडे यांच्या गटातील प्रवीण घुगे यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतले. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यासाठी अर्ज घेणाऱ्याने महाविकास आघाडीकडून अर्ज घेतल्याचे नोंदविले असले तरी शुक्रवारी शिवसेनेकडून अक्षय खेडकर यांनी अर्ज घेतल्यामुळे अद्याप महाविकास आघाडीची वरिष्ठ पातळीवर बैठक झाली नसल्याचे दिसत आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजवर ४१ इच्छुक उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले आहेत. १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज देणे आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. आजपर्यंत कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. भाजपमध्ये अचानक उमेदवारीसाठी स्पर्धा लागल्यामुळे मुख्य दावेदार असलेले शिरीष बोराळकर यांची घालमेल वाढली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब सुरू झाला आहे. चार जिल्ह्यांत विद्यापीठ, बँकेमुळे नेटवर्क आणि मराठा क्रांती मोर्चात सक्रिय सहभाग असल्यामुळे उमेदवारीसाठी शितोळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा कार्ड म्हणून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा शितोळे यांना आहे. दरम्यान, शितोळे यांनी सांगितले, अर्ज घेतला आहे. पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा आहे.
अलीकडच्या वीस वर्षांत जयसिंगराव गायकवाड यांनी दोन वेळेस नेतृत्व केले. त्यानंतर श्रीकांत जोशी यांनी एक टर्म नेतृत्व केले. मागील दोन निवडणुकांपासून सतीश चव्हाण हे नेतृत्व करीत आहेत. यावेळी मतदारसंघावर वर्चस्व मिळावे यासाठी राजकीय, सामाजिक समीकरणांचा विचार करून उमेदवारी देण्याबाबत भाजप विचार करीत आहे, तर अजून महाविकास आघाडीचा निर्णय न झाल्यामुळे आ. चव्हाण यांनीही देव पाण्यात ठेवले आहेत.
रविवारी दुपारपर्यंत निर्णय; शितोळे मुंबईत रविवारी दुपारपर्यंत भाजपकडून उमेदवारी निश्चित होणार आहे. उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर शितोळे मुंबईला रवाना झाले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत ते होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचाही अहवाल पक्षाकडून मागविण्यात आल्यामुळे त्यांनाही उमेदवारी मिळण्याचे वेध लागले आहेत, तर घुगे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून तयारी सुरू केल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे.