औरंगाबाद : “साहेब, आम्ही खुल्या अस्मानाखाली राहतो. दिवसभर अंगमेहनत करतो. उघड्यावरच स्वयंपाक, जेवण करतो. खुल्या हवेत झोपतो. बारा गावचे पाणी पचवलेय, आम्हाला कसला आला कोरोना? तो तर एसीत राहणाऱ्यांना होतो!” हे बोल आहेत शहरातील विविध भागांत पदपथावर झोपडीत राहणाऱ्या नागरिकांचे.
शहरातील सेव्हन हिल, मुकुंदवाडी, विमानतळ रोड आणि बीडबायपास येथील फुटपाथ, मैदानात राहणाऱ्या नागरिकांच्या दिनचर्येची पाहणी सदर प्रतिनिधीने केली. तेथील लोकांशी संवाद साधला. मागील वर्षभरात येथे कोणालाही कोरोना झाला नाही, असा दावा येथील लोकांनी केला.
मुकुंदवाडी स्मशानभूमीसमोरील फूटपाथवर ११ झोपड्या आहेत. येथे देवदेवतांच्या मूर्ती, माठ विक्रेते राहतात. धूत हॉस्पिटल ते चिकलठाणा विमानतळ रस्त्यावरील फुटपाथवर ३१ झोपड्या आहेत. येथे २५ कुटुंबे राहतात. कोणी गणपती मूर्ती बनवतात, कोणी आरसा विकतात तर कोणी मजुरी करतात. येथे काही चिमुरडे रस्त्याच्या कडेला मातीत खेळत होते. त्यांची आई, आजी झोपडीबाहेर विटांच्या चुलीवर भाकऱ्या करीत होत्या. रस्त्याने धावणाऱ्या वाहनांचा धूर त्यांच्या नाका-तोंडात जात होता, पण त्याची त्यांना फिकीर ना चिंता किंवा अडचणही जाणवत नव्हती. ही मंडळी भयमुक्त जगते आहे. यातील काही जणांकडे मास्क, सॅनिटायझरही होते.
येथे राहणाऱ्या लताबाई इंगळे या महिलेने सांगितले की, आम्ही हातावर पोट असणारी लोकं. आम्हाला ना घर ना दार. असेच उघड्यावर राहतो. हेच आमचे जीवन. सेव्हन हील ते गजानन महाराज रोडवर झोपडीत राहणारी जाते, वरवंटा विक्री करणारी १५ कुटुंबे आहेत. त्यांच्यापैकी एकालाही मागील वर्षभरात कोरोनाने स्पर्श केला नसल्याचे तेथील महिलांनी सांगितले. आम्ही बारा गावचे पाणी पचवले आहे. आम्हाला कसला कोरोना होतोय? तो तर बंगल्यात राहणाऱ्यांना होतो, असे त्या महिलांनी सांगितले.
चौकट
जडीबुटीचा इलाज
बीडबायपास रोडवर एमआयटी महाविद्यालयाच्या अलीकडील मैदानावर सुमारे १५० पेक्षा अधिक झोपड्यांतून जवळपास ८०० लोक राहतात. येथे परतूर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान येथील स्थलांतरित मजूर राहतात. सदर प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा अनोळखी व्यक्ती बघून सारेच झोपड्यांतून बाहेर आले. आपल्यासाठी जेवण आणले का, हे महिला, मुले पाहत होते. गॅस पाइपलाइनसाठी नाली खोदण्याचे काम करणारा येथील युवक रतन पवार याने सांगितले की, वर्षभरात या वस्तीमध्ये एकही जण कोरोनाबाधित झाला नाही. सर्दी, पडसे झाले की तेथे झोपडीत राहणारी राजस्थानची केसरबाई सितोडिया ही जडीबुटी विकणारी महिला काढा करून देते. कोणाकडून एक पैसाही घेत नाही. एसी, कूलरच्या सान्निध्यात राहणाऱ्यांना कोरोना होतो. आमच्यासारख्या खुल्या हवेत मातीवर झोपणाऱ्यांना नाही, असा टोलाही येथील महिलांनी मारला.
त्यातील जगदीश सोहान यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून फुटपाथच्या बाजूलाच राहतो. मात्र, आतापर्यंत आमच्यापैकी एकालाही कोरोना झाला नाही.