लोहारा : तालुक्यातील जि.प. च्या नऊ शाळामधील २३ वर्ग खोल्या या धोकादायक बनल्या असून, याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष नाही दिल्यास धोका निर्माण होऊ शकतो.१९९३ च्या भूकंपानंतर तालुक्यातील बऱ्याच गावचे पुनर्वसन झाले. त्यावेळी जि.प. शाळांच्या इमारती उभारण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश शाळाच्या इमारती या चांगल्या आहेत. त्यात लोहारा जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून, येथील विद्यार्थी संख्या आठशे आहे. यातील उपलब्ध वर्ग खोल्यापैकी चार वर्गखोल्या धोकादायक असल्याने यामध्ये विद्यार्थी बसवले जात नाहीत. त्यामुळे उर्वरित वर्ग खोल्या अपुऱ्या पडत असून, प्रयोगशाळा व वर्ग एकत्रच भरविला जातो. अचलेर येथील जि.प. कन्या शाळेतील पाच वर्ग खोल्या या धोकादायक आहेत. याकडे एका वर्गावरील गेल्या शैक्षणिक वर्षात वादळी वाऱ्यात खोल्या पावसात गळतात. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेसुद्धा अवघड होते. तर अचलेर येथीलच प्राथमिक शाळेत एका वर्गात तात्पुरती विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागूर, कास्ती (बु) व हराळी येथील दोन-दोन वर्ग खोल्या व उंडरगाव, वडगाव येथील तीन-तीन वर्ग खोल्या तर एकोंडी (लो) येथील एक वर्ग खोलीही धोकादायक आहे. यांची शिक्षण विभागाने तात्काळ लक्ष देऊन दुरुस्ती नाही केल्यास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)प्रस्तावाकडे दुर्लक्षवडगाव (गां) जि.प.शाळेतील तीन वर्ग खोल्या या धोकादायक आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भातचा ठराव हा शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पण याकडे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. काही धोका झाला तर याला शिक्षण विभागच जबाबदार असेल, असे वडगाव (गां) चे पोलीस पाटील एम.डी. लोहार यांनी सांगितले.उंडरगाव जि.प. शाळेतील धोकादायक तीन वर्ग खोल्याची दुरुस्ती करावी, यासाठी सतत ग्रामपंचायतकडून पाठपुरावा करीत असल्याचे उंडरगावच्या सरपंच प्रभावती गंगणे यांनी सांगितले. तालुक्यातील नऊ जि.प. शाळेच्या २३ वर्ग खोल्या या धोकादायक असून, त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. असा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे मार्चमध्येच पाठविण्यात आला असून, त्याचा पाठपुरावाही करीत आहोत. अचलेर कन्या शाळेचीही तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केल्याचे पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी सांगितले.
नऊ शाळांतील तेवीस वर्गखोल्या धोकादायक
By admin | Published: July 14, 2014 11:51 PM