औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात ऑक्टोबर २०१७ रोजी २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुलकर्णी यांनी एससी आणि एसटी (पीओए) कायद्याअंतर्गत ठोठावली आहे.सक्तमजुरीची शिक्षा ठोठविण्यात आलेल्या आरोपीमध्ये सागर सुभाष बुट्टे (२० वर्ष, रा. जयभवानीनगर, ग. न.५), अनिल अंबादास डुकले ( २६ वर्ष, रा. जयभवानीनगर, ग. न. १) उमेश उत्तम डुकले (२२ वर्ष, रा. जयभवानीनगर, ग. न. १) यांचा समावेश आहे.
जयभवानीनगर चौकात विवाहित महिला ५ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ८ वाजता उभी होती. वरील तिन्ही आरोपी (एमएच २०-ईएफ ०५७२) रिक्षातून आले व त्या महिलेला रेल्वेस्टेशन येथे सोडविण्यासाठी तिला रिक्षात बसविले. त्यानंतर आरोपींनी रिक्षात गॅस भरावयाचा आहे, असे सांगून मुकुंदवाडी येथील रामकाठी येथे नेले. तिथे बाहेरील बाजूस बंद शटर व पाठीमागील बाजूस पडीक भिंत असलेल्या खोलीमध्ये नेले व त्या महिलेस लोखंडी रॉडने मारहाण केली व त्यानंतर त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तपास पूर्ण करून पोलिसांनी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीत सरकारपक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. घटनेवेळी पीडितेला झालेल्या एकूण १४ जखमा डॉक्टरचा अहवाल व साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी तीनही आरोपींना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपीकडून मिळणाऱ्या दंडाची रक्कम मिळून ९९ हजार रुपये ही फिर्यादी पीडितेला मोबदला म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले.