औरंगाबाद : सुरुवात, चित्रपटाची कथा बदलविणारा ‘न्यूक्लिअस पॉइंट’ म्हणजेच मध्य आणि चित्रपटाचा शेवट या तिन्ही गोष्टी उत्तम प्रकारे सांभाळल्या गेल्या पाहिजेत. पॉपकॉर्न खात रमत-गमत प्रेक्षक बघत आहेत, तो माझ्या धाटणीचा चित्रपट नाही. माझ्या चित्रपटातील ‘टिष्ट्वस्ट आणि टर्न’ पे्रक्षकांना खेचून आणतात. आताचा प्रेक्षक हा चोखंदळ झाला असून त्यांची अभिरुची संपन्न करताना वास्तवाचीही कास धरावी लागते, अशा शब्दांत चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
नाथ ग्रुप, एमजीएम आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबादतर्फे आयोजित औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राघवन यांनी आयनॉक्स, प्रोझोन येथे ‘मास्टर क्लास’ घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहायक दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राघवन म्हणाले की, माणसाच्या चंचलपणाला स्थिरता देऊन चित्रपटगृहात प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचे कसब दिग्दर्शकाला जमले पाहिजे. अर्धवट वाटणाऱ्या घटना एकसंध करून पूर्ण रूपात गोष्ट साकारण्यासाठी दिग्दर्शकाने उत्तम संपादकही असायला हवे. राघवन यांच्या चित्रपटांमध्ये पुण्याचा संदर्भ आवर्जून येतो, असे का हे सांगताना ते म्हणाले की, पुण्यात वाढल्यामुळे तेथील सौंदर्य कायम भावते. पुण्याचे सौंदर्य लुप्त होण्याआधी ते कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करीत आहे.
गाण्याने खुलतो प्रसंग विजय आनंद यांच्या चित्रपटातून आपल्याला प्रेरणा मिळत असून, जुन्या चित्रपटांशी जुळलेले नातेच मला माझ्या चित्रपटातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करते. चित्रपटात कायम टिष्ट्वस्ट आणि टर्न असणे कंटाळवाणे ठरू शकते. म्हणूनच माझ्या चित्रपटांमध्ये मी संगीताला आवर्जून स्थान देतो.
अभिनेत्री म्हणजे ‘डेकोरेटिव्ह पीस’ नव्हे माझ्या सर्वच चित्रपटांमध्ये ज्या अभिनेत्री आहेत, त्यांच्या पात्रांना विशेष स्थान देण्यात आले आहे. अभिनेत्याभोवती जेवढी कथा फिरते, तेवढीच ती अभिनेत्रीभोवतीपण फिरते. माझ्या चित्रपटात अभिनेत्री केवळ ‘डेकोरेटिव्ह पीस’ म्हणून कधीच नसतात आणि नसाव्यात, असे मला वाटते.