लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना ९ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन आरोपींनी मुकुंदवाडी परिसरातील अनेक महिलांना बचत गटासाठी कर्ज काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले. दहा ते पंधरा महिला आरोपींविरोधात तक्रार अर्ज घेऊन सोमवारी गुन्हे शाखेत आल्या होत्या.प्रशांत दिनकर जंजाळ आणि वैभव भगवान भोसले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोघे सध्या मुकुंदवाडी पोलिसांच्या कोठडीत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बीएसएनएल, आरटीओ कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून दोन्ही आरोपींनी शहर आणि ग्रामीण भागातील पाच जणांकडून ९ लाख रुपये उकळले. यानंतर त्यांना नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रेही त्यांनी दिले होते. छायाचित्रासह आरोपींच्या अटकेचे वृत्त प्रकाशित होताच मुकुंदवाडी परिसरातील अनेक महिलांनी त्यास ओळखले.महिला बचत गटांना बँका आणि केंद्र शासनाच्या योजनेतून कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून प्रत्येकी पाच हजार रुपये त्यांनी उकळले होते. विशेष म्हणजे आरोपी वैभव हा बचत गटांच्या महिलांना याविषयी आमिष दाखवित आणि तो त्याचे साहेब म्हणून आरोपी प्रशांत जंजाळ याची भेट करून देत. महिलांकडूनही रकमा उकळल्यानंतर त्याने एकाही बचत गटाला कर्ज मिळवून दिले नव्हते.आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र, दोन्ही आरोपी एन-२, ठाकरेनगर येथील भाड्याने घेतलेले घर सोडून पसार झाले होते. दरम्यान त्यांना अटक केल्याचे समोर येताच तक्रार अर्ज घेऊन महिला प्रथम गुन्हे शाखेत आणि नंतर मुकुंदवाडी ठाण्यात दाखल झाल्या.
‘त्या’ दोन आरोपींनी बचत गटाच्या नावाखाली घातला महिलांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:22 AM