औरंगाबाद: जीम ट्रेनरवर गोळ्या झाडल्याचे कळताच पुंडलिकनगर पोलिसांनी झटपट कारवाई करीत तीन आरोपींपैकी दोन जणांच्या घटनेनंतर अवघ्या चार ते पाच तासात बायपासवरील बाळापुर फाटा शिवारात पकडले. आरोपींकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहादेव महादेव सोनवणे (वय २९), जितेंद्र वसंत राऊत(वय २२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा तिसरा साथीदार सलीम हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त म्हणाले , शिवाजीनगर येथील व्यायाम शाळेत ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या शेख अलीम शेख नवाब यांच्यासोबत मंगळवारी रात्री हाणामारी झाली होती. मारहाणीत पुढे असलेला शेख अलीम हा शिवाजीनगर येथे व्यायाम शाळेत असतो, ही माहिती आरोपींना होती. यामुळे बुधवारी सकाळीच तिन्ही आरोपीं गावठी कट्टा सोबत घेऊन अलीमच्या व्यायामशाळेत गेले. तेथे जितेंद्र आणि सलीम यांनी अलीमला पकडले तर शहादेवने कमरेचा गावठी पिस्तूल काढून त्यातून अलीमवर गोळी झाडली. सुदैवाने मात्र पिस्तूल लॉक झाल्याने गोळी सरळ न जाता ती वर उडून खाली कोसळली.
यामुळे अलीमचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. याबाबत माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी मच्छिंद्र शेळके, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, राजेश यदमळ, जालिंदर मांटे यांनी घटनेचा पंचनामा केला, यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच त्यांना तेथे जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपीने घरात लपूवन ठेवलेले पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.