लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बहुचर्चित संकेत कुलकर्णी हत्या प्रकरणातील पसार मारेकरी उमर अफसर शेख (१९, रा. कौसरपार्क, देवळाई) यास देवळाई तर विजय नारायण जौक (२४, रा. बाळापूर) यास पैठण येथून हॉटेलमधून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. मारेकरी संकेत जायभाये हा ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत असून संकेत मचे हा अद्यापही फरार आहे.संकेत कुलकर्णी खुनातील आरोपी संकेत जायभाये यास अटक केली असून, तो पोलीस कोठडीत आहे; परंतु त्याचे साथीदार उमर, विजय, संकेत मचे हे पोलिसांना सापडत नव्हते. त्या आरोपींचे लोकेशन पोलिसांना भेटत नसल्याने फरार आरोपींच्या पालकांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.पुन्हा रविवारी शोक सभेला नागरिकांचा रोष व प्रथमदर्शींनी पुढे येऊन आपण संकेत कुलकर्णी याच्या मारेकऱ्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही, तसेच येत्या सोमवारी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले होते.त्या फरार आरोपीपैकी उमर व विजय या दोघांना गुन्हे शाखा पथकाचे फौजदार शेख हारुण, सहायक फौजदार कौतिक गोरे, पोकॉ. असलम शेख, विजय चौधरी, कैलास काकड, सोमकांत भालेराव, प्रकाश सोनवणे आदींच्या पथकाने सापळा रचून शिताफीने अटक केली. पकडलेल्या आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर दाखल करून खुनातील आणखीन धागेदोरे मिळविण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार आहे.परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी संकेत कुलकर्णी (१९) इयत्ता १२ वीची परीक्षा देऊन औरंगाबादला नातेवाईक व मित्रांना भेटण्यासाठी आला होता. उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जाणार होता. त्याअगोदरच त्याचा क्रूरपणे खून करून आरोपी पसार झाले होते.संकेत कुलकर्णी खून प्रकरणआरोपींनी खुनाचा कट संगनमताने रचला होता. ते संकेतच्या खुनातील साथीदार असून, विजय जौक हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, तो या पूर्वीही खुनाच्या गुन्ह्यात अटक होता. नुकताच तो सुटून आला होता, तर उमर शेख हा कौसरपार्क येथे वास्तव्यास असून, पांढरओव्हर (ता. गंगापूर) येथील मूळचा रहिवासी आहे. त्याचे वडील सिव्हिल ठेकेदारी करतात. संकेत मचे हा सातारा परिसरातील असून तोदेखील पोलिसांना गुंगारा देत असून, त्याच्या मागावर पोलीस आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रमोरे करीत आहेत.
खून प्रकरणातील दोन आरोपी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:38 AM