औरंगाबाद : खरेदी केलेल्या फ्लॅटचे ठरल्याप्रमाणे २५ लाख रुपये दिल्यानंतर रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ८ जणांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही आरोपीला अटक करण्यात येत नव्हती. याविषयी पत्रकार परिषद घेत पोलीस अधिकारी आरोपीला शोधून आणण्यास सांगत असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. त्यानंतर आवघ्या चारच दिवसांत गुन्हे शाखेने या प्रकारणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
गुन्हे शाखेने पैठण येथून अटक केलेल्या आरोपींमध्ये आदित्य रत्नाकर गारपगारे व योगेश पंडित उभेदळ या दोघांचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सहायक फाैजदार विठ्ठल जवखेडे, शिपाई संदीप बिडकर, नितीन धुमाळ, नितीन देशमुख, विजय भानुसे, प्रभात मस्के, लखन गायकवाड यांच्या पथकाने या दोन आरोपींना अटक केली. पथकातील पोलिसांनी पासपोर्ट काढायचा असल्याचे सांगून आदित्य गारपगारे याचे घर शोधले. सतत हुलकावणी देणारा गारपगारे घरीच असल्यामुळे सापडला. याचवेळी पैठणमधील दुसरा आरोपी योगेश उभेदळ यालाही पथकाने अटक केली. या दोघांना सातारा पोलीस ठाण्यात दाखल केले. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.
चौकट,
काय आहे प्रकरण
गणेश रावण ढोबळे (रा. जांभळी, ता. पैठण) यांची दोन एकर शेतजमीन डीएमआयसीकडे हस्तांतरित झाली आहे. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी कांचनवाडी परिसरातील अण्णासाहेब एकनाथ लोखंडे याचा फ्लॅट २५ लाख रुपयांना विकत घेतला होता. हा व्यवहार होण्यापूर्वी योगेश उभेदळ, अशोक शेजूळ व सचिन जाधव यांनी ढोबळे यांची आदित्य गारपगारेसोबत ओळख करून दिली. गारपागारेने त्याचे शिक्षक मामा मंगेश भागवत याच्याशी संपर्क साधत लोखंडे याचा फ्लॅट ढोबळेंना दाखविला. २५ लाख रुपयांत व्यवहार ठरला. इसारपावती करताना ढोबळे यांच्याकडून २५ लाख रुपयांचा कोरा धनादेश लोखंडे याने घेतला. काही दिवसांनी हा धनादेश आदित्य गारपगारे याच्या नावाने वटविण्यात आला. काही कालावधीनंतर लोखंडे याने फ्लॅटचे पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट करीत ढोबळे यांना रजिस्ट्री करून देण्यास नकार दिला. उलट सातारा पोलीस ठाण्यात ढोबळेंच्या विरोधात तक्रारही दिली होती. या प्रकरणात ढोबळेंच्या तक्रारीवरून गारपगारे, भागवत, जाधव, शेजूळ, उभेदळ, विपुल वक्कानी, लोखंडे आणि संदीप भगत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.