औरंगाबाद : नळावर पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या अण्णासाहेब बनसोडे यांच्या खुनाच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी प्रकाश हरिश्चंद्र भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला.
गावातील नळावर पाणी भरण्याच्या वादातून आणि शेतीच्या जुन्या वादावरून ३१ आॅगस्ट २०११ रोजी पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील अण्णासाहेब बनसोडे यांचा सय्यद निसार सय्यद हबीब (३२), प्रकाश हरिश्चंद्र भुजंग (२९), अमोल रघुनाथ चाबूकस्वार (३५) आणि सय्यद हबीब सय्यद अहमद या चौघांसोबत वाद झाला होता. त्या चौघांनी शिवीगाळ करून लोखंडी फायटर आणि लाकडी दांड्याने मारहाण करून अण्णासाहेब यांना जखमी केल होते. त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरू असताना १ सप्टेंबर २०११ रोजी ते मरण पावले. यासंदर्भात त्यांची पत्नी राधाबाई यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रारीत दिली होती. त्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादीसह दोघे जण फितूर झाले. न्यायालयाने प्रकाश भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला, तसेच कलम ३२४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडा ठोठावला. सय्यद निसार आणि सय्यद हबीब या दोघांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.