औरंगाबाद: ३ जुलैच्या रात्री डोंगरगाव शिवारातील तीन जिनिंगचे कार्यालय फोडून १३ लाख ६९ हजार ९९४ रुपयांची रोकड आणि ३०० अमेरिकन डॉलर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने शनिवारी जालना येथे अटक केली. अटकेतील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या चोरीच्या दोन जीप आणि दारूसाठा, धारदार शस्त्रे आणि रोख रक्कम असा सुमारे १३ लाख ८०हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
तेजासिंग नरसिंग बावरी (वय २२,रा. मंगलबाजार, जालना) आणि तकदीरसिंग टिटुसिंग टाक(रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि.बुलडाणा)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ३ जुलै रोजी रात्री डोंगरगाव शिवारातील हरिओम कॉटन जिनिंगचे कार्यालय फोडून चोरट्यांनी १३ लाख ६९ हजार ९९४ रुपयांची रोकड आणि ३०० अमेरिकन डॉलर चोरट्यांनी पळविले होते. तसेच तेथील सीसीटिव्ही कॅमेरे आणि डिव्हीआर चोरटे सोबत घेऊन गेले होते. याविषयी सिल्लोड ठाण्यात रोहित संतोष अग्रवाल यांनी फिर्याद नोंदविली होती.
ही चोरी जालना शहरातील तेजासिंग बावरी याने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेला खबऱ्याने दिली. जालना येथील रामनगरमधील एका हॉटेलमधून तेजासिंग बाहेर पडल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत तकदिरसिंग आणि अन्य साथीदारांची नावे सांगितले. पोलिसांनी लगेच तकदिरसिंगला पकडले. त्यांचे अन्य साथीदार मात्र पसार आहेत. आरोपींकडून दोन जीप, देशी -विदेशी दारूचे बॉक्स, नगदी रोकड आणि गुन्हा करताना वापरलेली साहित्य जप्त केली.