औरंगाबाद : गावठी कट्ट्याची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला.महेश काशिनाथ काळे (२५, रा . जामगाव , ता . गंगापूर ) आणि सागर विजय कदम ( ३०, रा . आंबेवाडी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १६ जून रोजी गंगापूर तालुक्यात गस्तीवर असताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार महेश काळे याच्याजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. यानंतर पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप सोळुंके, कर्मचारी वसंत लटपटे, विठ्ठल राख, नवनाथ कोल्हे , विक्रम देशमुख , राजेंद्र जोशी, शेख नदीम, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे यांच्या पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आरोपी सागर कदम त्याच्याकडून चाळीस हजार रुपयात गावठी कट्टा विकत घेतल्याची कबुली दिली . तसेच खरेदी केलेला कट्टा गंगापूर येथे लपवून ठेवल्याचे सांगितले . पोलिसांनी पंचांच्या समक्ष गावठी कट्टा जप्त केला. यानंतर सागर कदम त्यालाही अटक केली .
चौकशीदरम्यान, मध्यप्रदेशातून गावठी कट्टा आणून महेशला विक्री केल्याची कबुली सागरने दिली. आरोपी महेश काळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. अहमदनगर जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध दरोडे आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली. आरोपी सागरने अशाप्रकारे अनेकांना गावठी कट्ट्याची विक्री केली असावी. असा संशय त्यांनी व्यक्त केला.