औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे सात जणांनी व्यावसायिक कर्ज उचलून बँकेला ६७ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार घडला असून, बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री या दोन आरोपींना अटक केली. नईमोद्दीन सलिमोद्दीन नागोरी (४८, रा. एस.टी. कॉलनी), मोहंमद मुजम्मील अब्दुल अलीम खान (३२, रा. पीरबाजार) असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री त्यांना अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चौघांना अटक केली होती. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.एचडीएफसी बँकेच्या पद्मपुरा शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ दिगूरकर यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती की, काही कर्जधारकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केली. ही तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, फौजदार सुभाष खंडागळे, पोलीस हवालदार प्रकाश काळे, सुनील फेपाळे, नितीश घोडके, मनोज उईके, जयश्री फुके यांनी या तक्रारीची सखोल चौकशी केली. त्यात सात जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून व्यावसायिक कर्ज घेतले. बनावट कर्जाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेला तब्बल ६७ लाख ८५ हजार ६४२ रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले. तक्रारीवरून सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने मोहंमद मजाजुद्दीन मतिनोद्दीन सिद्दीकी (२७, रा. चेलीपुरा), शेख जावेद खलील (२७, रा. अंबेलोहळ, ता. गंगापूर), शेख उबेद शेख हुसेन (२८, रा. जहाँगीर कॉलनी), खान आसेफ गुबाल खान (४३, रा. शाहनगर, बीड बायपास) या चौघांना अटक होती.या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री नईमोद्दीन, मोहंमद मुजम्मील या दोन आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार सुभाष खंडागळे करीत आहेत.
बनावट कागदपत्राअधारे ६७ लाखांचे कर्ज लाटणाऱ्या आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 11:14 PM