सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यावर सोमवारी एका जिनिंगजवळ चंदनाची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्या ताब्यातून १ लाख रुपयांचे चंदन व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पिशोर हद्दितून कठोरा बाजार येथे चंदन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, शिरसाठ यांनी पथकासह एका जिनिंगजवळ सापळा रचला. यावेळी कठोरा बाजार (ता. भोकरदन जि. जालना) येथील जब्बारखान अब्दूलखा पठाण (५०), प्रकाश सांडू मेहेर (५३) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३१ किलो चंदन, एक दुचाकी असा अंदाजे ९४ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. वैजापूर तालुक्यात ही चंदन तस्करी केली जाणार असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. सिल्लोड तालुक्यात चंदन तस्कर पुन्हा अवतरल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात चंदनाची झाडे आहेत. त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.