खुलताबाद: बकऱ्या चारणाऱ्या दोन मुलांचा तलाववाडी येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून तब्बल तीन तासानंतर मुलांचे मृतदेह बाहेर काढले. संकेत गुलाब बमनावत (१७ ), आयुष त्रिंबक नागलोद ( ७) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत गुलाब बमनावत ( १७ ), आयुष त्रिंबक नागलोद ( ७, दोघेही रा. तलाववाडी ता खुलताबाद) हे दोघे नेहमी प्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी तलाववाडी परिसरातील डमडम तलाव परिसरात गेले. यावेळी आयुष नागलोद हा पोहण्यासाठी तलावाच्या कडेला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्यासाठी संकेतने पाण्यात उडी मारली. पंरतू, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, शेजारील शेतातील महिलांना दोन्ही मुले गायब असल्याचे दिसले. त्यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली.
वेरूळ येथील ग्रामस्थांनी डमडम तलाव परिसरात येवून दोघा मुलांचा शोध घेतला. परंतु, ते काही दिसले नाहीत. पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी खुलताबाद पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे, बीट जमादार राकेश आव्हाड, संजय ठोंबरे दाखल झाले. लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत वेरूळ येथील पट्टीचे पोहणारे नाना ठाकरे, कैलास मोरे, संजय सोनवणे, सोनाजी ठाकरे हे तलावात उतरले. संकेत व आयुष यांचा मृतदेह तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्याबाहेर काढला.