छत्रपती संभाजीनगर : मागील १७ महिन्यांपासून वीजचोरी करणाऱ्या दोन भावांच्या घरावर भरारी पथकाने छापा मारून तब्बल १८ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात दोन भावांसह इतर तीन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
महावितरणच्या भरारी पथकाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता पप्पू गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवन धोंडीराम पंडित (रा.प्लॉट क्र - १०, कासंबरीदर्गा, पडेगाव) यांनी मागील १७ महिन्यांपासून ७५ हजार ७७८ युनीट एवढी वीजचोरी केली. त्यामुळे महावितरणचे १२ लाख ७६ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणात महावितरणने ९ लाख रुपये तडजोडीची रक्कम ठरवून दिली होती. मात्र संबंधितांनी ती सुद्धा भरली नाही.
दुसऱ्या घटनेत जीवन धोंडिराम पंडित यांच्या विरोधात महावितरणचे सुरज घेवारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ५ लाख ३५ हजार १०० रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा नोंदवला. जीवन पंडित यांनी ३३ हजार १० युनीट विजेची चोरी केली. त्यांची तडजोड रक्कम २ लाख १० हजार रुपये एवढी होती. त्याशिवाय सुखबीरसिंग चंडोक, जसदिपसिंग चंडोक आणि सुरजीतकौर बेदी (सर्व रा. उस्मानपुरा) या तीन जणांनी मागील ५३ महिन्यांपासून २ हजार ७१४ युनीट विजेची चोरी केली. त्यामुळे कंपनीचे ४२ हजार ५२० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे अभियंता पप्पू गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या तिन्ही प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. तिन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक सुरेश जिरे करीत आहेत.
सिडकोतही एक गुन्हा दाखलसाई छाया हॉटेलचे विलास रामदास राऊत यांनी वीज वाहिनीवर आकडा टाकून महावितरण कंपनीचे ७९ हजार ६५० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यात तडजोड रक्कम १० हजार रुपये असतानाही त्यांनी भरली नाही. महावितरणचे सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून विलास राऊत यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.