औरंगाबाद : सिडको एन-२, ठाकरेनगर येथील बंद असलेल्या घरात चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे अन्य दोन साथीदार फरार आहेत. या चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी लॅपटॉप, एलईडी टीव्ही व दोन मोबाइल असा एकूण १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला असल्यामुळे गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींसह जप्त केलेला मुद्देमाल त्या ठाण्याकडे सुपुर्द केला आहे. मुकेश महेंद्र साळवे व उमेश महेश गवळी अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रमोद नारायण खरात हे त्यांचे ठाकरेनगर येथील घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. तेव्हा २६ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास मुकेश साळवे, उमेश गवळी, अक्षय डोके व आकाश आठवले या चौघांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील एक थिंक पॅड, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, दोन मोबाइल व रोख ३५ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी प्रमोद खरात यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांना या गुन्ह्यातील टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल हा मुद्देमाल मुकुंदवाडी परिसरात राहाणाऱ्या मुकेश साळवे याच्या घरात असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, साहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, हवालदार चंद्रकांत गवळी, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ, अनिल थोरे, नितीन देशमुख आदींनी मुकेश साळवे यांच्या घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेतले व या घटनेतील चोरीचा मुद्देमाल जप्त केला. तेव्हा त्याने ही घरफोडी उमेश गवळी, अक्षय डोके व आकाश आठवले अशी चौघांनी मिळून केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी उमेश अटक केली असून, उर्वरित दोन जण फरार आहेत.
चौकट..................
चौघांनी मिळून वाटून घेतली रक्कम
पोलिसांनी या दोन आरोपींना आपला खाक्या दाखविल्यानंतर सदरील घरफोडीतील रोख ३५ हजार रुपयांची रक्कम चार आरोपींनी वाटून ती खर्च केल्याचे सांगितले. तथापि, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी मुकेश साळवे याच्यावर दरोडा, तर उमेश गवळी याच्यावर लूटमारीचे गुन्हे विविध ठाण्यांमध्ये दाखल आहेत.