दाैलताबाद / औरंगाबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यासमोर दोन कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ३ जण ठार झाले. शनिवारी (दि.२४) रात्री ११.३० वाजेदरम्यान पोलीस चौकीसमोर ही घटना घडली. यात दीपक खोसरे (४५, रा. गल्लेबोरगाव), मदन अशोक जगताप (२८), राजू आसाराम मानकीकर (३४, रा. गल्लेबोरगाव), अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे असून, अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. यातील एकावर औरंगाबादच्या घाटीत, तर दुसऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी रात्री औरंगाबादहून खुलताबादकडे जाणारी एसयूव्ही कार (एमएच-२० सीएस-५४६२) आणि खुलताबाद येथून औरंगाबादकडे येणाऱ्या कार (एमएच-२० डीजे-१७७१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. दौलताबाद पोलीस चौकीजवळ हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे, पोलीस अंमलदार पी.डी. पचलोरे, के.पी. कांबळे, शरद बच्छाव, प्रभाकर पाटेकर, सचिन त्रिभुवन, नईम सय्यद यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत उपचारासाठी दाखल केले. यात दीपक खोसरे (४५, रा. गल्लेबोरगाव), मदन अशोक जगताप (२८) यांचा रस्त्यातच, तर राजू आसाराम मानकीकर (३४, रा. गल्लेबोरगाव) यांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कारमधील सुनील कृष्णा अवटे (४३, रा. कसाबखेडा), राजू रंगनाथ वरकड (४७, रा. ज्योतीनगर, औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील दोन्ही कारचे नुकसान झाले. या अपघाताची दौलताबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
--- छायाचित्र