औरंगाबाद : वाल्मी कार्यालयातील कंत्राटासाठी ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन 'क्लास टू' अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या अधिकाऱ्यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
लेखाधिकारी प्रदीप प्रल्हाद बाहेकर (४७, रा. पारिजातनगर, एन ४), लेखाधिकारी मोहन दशरथ शेलार (५२, रा. व्हिजन सिटी), अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. एसीबीच्या माहितीनुसार तक्रारदाराचा मित्र कंत्राटदार आहे. त्यास वाल्मी कार्यालयातील ११ लाख ५० हजार रुपयांचे काम मिळाले होते, तसेच आणखी ८ लाख ९० हजार रुपयांचे काम मंजूर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेला बाहेकर याने ३० हजार रुपयांची लाच मागितली. अगोदरच पैसे दिल्यामुळे आणखी पैसे देण्याची तयारी नसल्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर बाहेकरने पैशाची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एसीबीचे निरीक्षक हनुमंत वारे यांच्या पथकाने वाल्मी परिसरातील पैठण रोडवरील व्हिजन सिटी बिल्डिंगसमोर सापळा लावला. लाच मागितलेले पैसे घेताना मोहन शेलार यास रंगेहाथ पकडले. त्यानंतर बाहेकर यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक हनुमंत वारे, अंमलदार साईनाथ तोडकर, विलास चव्हाण, सुनील पाटील व सी.एन. बागूल यांनी केली.
मागितली एकाने, अडकला दुसराच३० हजार रुपयांची लाच प्रदीप बाहेकर याने मागितली होती. लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार सोमवारी रात्री १० वाजता वाल्मी परिसरात पोहोचला. तेव्हा बाहेकरने त्याच परिसरात राहणारा सहकारी मोहन शेलार याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. लाचेचे पैसे ठेवून घेण्यास शेलार तयार झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. त्यामुळे लाच मागितली एकाने आणि घेताना रंगेहाथ पकडला दुसराच, असे घडले.
आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहातआरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यामुळे दोघांना हर्सूल कारागृहात पाठविल्याची माहिती एसीबीच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, वाल्मीचे दोन 'क्लास टू' अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.