वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमधील दोन कंपन्यांत सोमवारी पावसाच्या पाण्याबरोबर नालीतील सांडपाणी शिरल्यामुळे उद्योजक व कामगारांची चांगलीच धांदल उडाली. या भागातील नालीचे काम अर्धवट सोडल्यामुळे सांडपाणी कंपनीत साचत असल्याची ओरड उद्योजकांनी केली आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरात सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे या परिसरातील नाल्यातील पाणी पावसाच्या पाण्याबरोबर डब्ल्यु सेक्टरमधील एस.एम.दरक अॅण्ड सन्स (प्लाटॅ क्रमांक ८४), व तौसिफ सिस्टीम टुल्स (प्लॉट क्रमांक ८५) या दोन कंपन्यांत शिरले. या दोन्ही कंपन्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्यामुळे कंपनीत कामगार व अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
कंपनीच्या आवारात साचलेले पाणी कंपनीत शिरुन मशनरी व साहित्याची नासधुस होऊ नये, यासाठी कामगारांनी किमंती मटेरियल व साहित्य हलविल्यामुळे मोठे नुकसान टळले. या सेक्टरमधील सांडपाणी वाहून जाणाºया नालीचे काम अर्धवट सोडल्यामुळे पावसाळ्यात सतत सांडपाणी कंपनीत शिरत असल्याचे उद्योजक शेख असिफ, विष्णू विटेकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या सेक्टरमधील गटार नाल्याची नियमीतपणे साफ-सफाई केली जात नसल्याचा आरोप उद्योजक व कामगारांनी केला आहे. या सेक्टरमधील अर्धवट राहिलेल्या नालीचे काम पूर्ण करुन नियमितपणे साफ-सफाई करण्याची मागणी उद्योजक व कामगारांतून होत आहे.