छत्रपती संभाजीनगर : कोरोना संसर्गाची लागण राज्यातील इतर शहरांसह आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील झाली आहे. सिडको एन-७ परिसरातील दहा वर्षाची मुलगी, ६५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पॉझिटीव्ह आढळेलल्या रुग्णांना जेएन १ या नवीन व्हेरियंटची लागणी झाली आहे की नाही, यासाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान गुरुवारी २९ रुग्णांच्या आरटीपीसीआरचे स्वॅब तपासणीसाठी घाटी रुग्णालयातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. असे मनपाच्या सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले. प्रत्येक आरोग्य केंद्रात संशयीत रुग्णांची अॅण्टिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करावी. तसेच आरटीपीसीआरचे स्वॅब घाटीच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सुचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिल्या आहेत.
त्या रुग्णांना केले होम क्वारंटाईन....
सिडको एन-७ भागातील दहा वर्षाची मुलगी आणि ६५ वर्षीय महिलेचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून त्या रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांशी संपर्क केला आहे, त्यांची प्रकृती ठिक आहे.
दोन्ही रूग्णांना सात दिवस घरातच उपचाराचा सल्ला दिला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी त्यांची तपासणी करतील. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याच्या सुचना केल्या आहेत.
२० रोजी मनपा आरोग्य केंद्रात ६६ रुग्णांची चाचणी केली. त्यातील २१ रुग्णांचे आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी घाटी प्रयोगशाळेत दिले होते. रिपोर्टमध्ये १९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. -डॉ.अर्चना राणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
मास्क वापरा, गर्दी टाळा...
दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून व्हायरल फिव्हरने आजारी रुग्णांनी मास्कचा वापर करावा, नेहमी हात धुवावेत, भरपूर पाणी प्यावे, वारंवार चेहऱ्याला व डोळ्याला हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शिकंताना व खोकलतांना नाका-तोंडाला रुमालाचा वापर करावा, सर्दी, ताप तीन दिवसापेक्षा अधिक दिवस असेल तर तातडीने मनपाच्या आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी. असे आवाहन मनपाने केले आहे.