औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आज एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या रिमांड यादीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी त्या दोघांनाही ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली. मात्र, त्यानंतर त्या दोघांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले. परिणामी त्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
महापालिकेच्या १६ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ६० चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक २० चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घालून महापौरांचा राजदंड सभागृहाबाहेर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या दोघा नगरसेवकांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि खुर्ची फेकून मारली, असे जाधव यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यावरून वरील दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
घटनेपासून वरील दोघे फरार होते. पोलिसांनी त्यांना आज (दि.५ जानेवारी) अटक करून न्यायालयात हजर केले व त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्याची विनंती केली. त्यावरून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना विशेष सरकारी वकील रवींद्र अवसरमोल आणि किशोर जाधव यांनी विरोध केला. वरील दोघांविरुद्ध यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकून तपास कामात अडथळा निर्माण करू शकतात. त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघांचेही जामीन अर्ज नामंजूर केले. परिणामी पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी केली.