लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) दोन कोटी ५ लाखांचे एक्स-रे सिम्युलेटर यंत्र दाखल झाले आहे. कर्करोगाच्या रुग्णांना रेडिएशन देण्यासाठी हे यंत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कर्करोग रुग्णालयास भाभा ट्रॉन-२ हे विशेष यंत्र प्राप्त झाले आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात बंकर उभारण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत या रुग्णालयातील उपचाराने हजारो रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. या ठिकाणी मराठवाड्यातील ८ जिल्हे, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, जळगाव, नाशिक तसेच अन्य राज्यांमधूनही रुग्ण येतात. परिणामी, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून, गोरगरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय आशेचा किरण ठरत आहे. ‘भाभा ट्रॉन’ उपकरणामुळे येथील रुग्णसेवा वाढविण्यासाठी मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कर्करोगाच्या रुग्णास देण्यात येणाऱ्या रेडिएशनचे प्रमाण निश्चित करण्यासाठी सिम्युलेटर यंत्र आवश्यक असते. जानेवारीमध्ये भाभा ट्रॉन यंत्रासाठी आवश्यक २ कोटी ५ लाख ८२ हजार ५६३ रुपयांच्या सिम्युलेटर या यंत्र खरेदीला मान्यता मिळाली होती. हे सिम्युलेटर यंत्र अखेर रुग्णालयात दाखल झाले आहे. ‘भाभा ट्रॉन’च्या बंकरमध्ये हे यंत्र कार्यान्वित केले जाईल. महिनाअखेरपर्यंत ‘भाभा ट्रॉन’देखील कार्यान्वित होईल, अशी माहिती शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. कर्करोग रुग्णालयासाठी अनेक यंत्रसामग्रींना मंजुरी मिळाली आहे. या यंत्रसामग्रींमुळे रुग्णालय अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होत आहे.
कर्करोग रुग्णालयात दोन कोटींचे यंत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:14 AM