औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रशासन, शासन शहर स्मार्ट करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मात्र, मोकाट कुत्रे सर्वसामान्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. दररोज वेगवेगळ्या भागात नागरिकांचे लचके तोडल्याची प्रकरणे उघडकीस येतात. महापालिकेने गत पाच वर्षांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीवर तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले आहेत.
महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीसाठी एका खासगी कंपनीची नेमणूक केली आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी खासगी कंपनीला ७५० रुपये देण्यात येतात. कंपनीने तीन वाहने कुत्रे पकडण्यासाठी आणलेली आहेत. कंपनीचे ७ आणि महापालिकेचे ७ कर्मचारी कुत्रे पकडण्यासाठी नेमण्यात आले आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात नसबंदीचा कार्यक्रम बंद होता. दोन वर्षांपासून खासगी कंपनीच्या सहकार्याने नसबंदी सुरळीत सुरू आहे. मागील वर्षी महापालिकेने जवळपास ६ हजार ६००, तर यंदा ६ हजार ८०० पेक्षा अधिक कुत्र्यांवर नसबंदी केली आहे. नसबंदी केलेल्या वर्षी रिझल्ट दिसून येत नाही. त्याच्या पुढच्या वर्षी कुत्र्यांच्या प्रजननक्षमला ब्रेक लागतो, असे महापालिकेचे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
हजारो कुत्र्यांसाठी १४ कर्मचारी
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या जवळपास ६० हजार आहे. महापालिका अनेक वर्षांपासून ४० हजार कुत्रे असल्याचा दावा करीत आहे. कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेकडे फक्त सात कर्मचारी आहेत. खासगी कंपनीच्या आणखी सात कर्मचाऱ्यांची यासाठी मदत घेण्यात येते. एकूण चौदा कर्मचारी काही वर्षांपासून काम करीत आहेत. शहराच्या कुत्र्यांची संख्या लक्षात घेता कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे.
दररोज १५ तक्रारी येतात
शहराच्या वेगवेगळ्या भागात मोकाट कुत्रे त्रास देत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होतात. दिवसभरातून किमान पंधरा ते वीस तक्रारी येत असतात. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या तक्रारींचे निरसन महापालिकेकडून करण्यात येते. ज्या भागात कुत्रा पकडण्यासाठी मनपाचे पथक गेलेले असते तेथून कुत्रे धूम ठोकतात.
सिल्लेखाना, जकात नाक्यावर भयभीत परिस्थिती
मध्यवर्ती जकात नाका परिसरात २४ तास किमान शंभर-सव्वाशे कुत्रे फिरत असतात. रात्री या भागातून दुचाकीस्वार ये-जा करू शकत नाहीत. अशीच परिस्थिती सिल्लेखाना भागात आहे. दुचाकीस्वाराच्या मागे कुत्रे लागल्यावर तो हमखास पडून जखमी होतो.
७५०
रुपये एका कुत्र्याच्या नसबंदीवर खर्च
०१
कंपनीची महापालिकेने नसबंदीसाठी केली नियुक्ती.
हळूहळू संख्या कमी होतेय
शहरात मागील काही वर्षांपासून महापालिकेने कुत्र्यांची नसबंदी सुरू केली. त्यामुळे वेडसर कुत्र्यांचे प्रमाण कमी झाले. पूर्वीच्या तुलनेत कुत्रे आता फारसे अंगावर येत नाहीत. नसबंदीमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिकेने मोफत श्वान दत्तक योजना सुरू केली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात मोकाट कुत्रे रस्त्यांवर कमी दिसून येतील.
डॉ. बी. एस. नाईकवाडे, प्राणीसंग्रहालय संचालक, मनपा.