लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर्तव्याच्या वेळी गैरहजर आढळलेल्या नेकनूर ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अधीक्षक जी. श्रीधर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. याच ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची उचलबांगडी करुन इतर ठिकाणी बदली करण्यात आली.पोलीस नाईक नंदकुमार सवासे व भाऊसाहेब काळे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. १३ मे रोजी अधीक्षक श्रीधर हे मध्यरात्री गस्तीवर होते. त्यांनी अचानक नेकनूर ठाण्याला भेट दिली. यावेळी नेकनूर ठाणे हद्दीत गस्त घालण्याची जबाबदारी असलेले पोलीस नाईक सवासे कर्तव्यावर नव्हते. शिवाय कोठडीतील आरोपींच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस नाईक काळे हे देखील कर्तव्यावर नव्हते. सवासे यांना तात्काळ समोर हजर राहण्याचे आदेश श्रीधर यांनी दिले; परंतु ते आलेच नाही. त्यामुळे अधीक्षक श्रीधर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले. त्यांना पोलीस मुख्यालयात सकाळ, सायंकाळ हजेरी लावण्याच्या सूचना निलंबन आदेशात देण्यात आल्या आहेत. नेकनूर येथे डॉक्टराच्या घरावर मागील आठवड्यात दरोडा पडला होता.यावेळी केवळ हजेरी रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करुन जमादार सोनाजी हंबर्डे गायब झाले होते. त्यामुळे त्यांची युसूफवडगाव ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
दोन दांडीबहाद्दर पोलीस निलंबित
By admin | Published: May 17, 2017 11:35 PM