औरंगाबाद : काँग्रेसशी आघाडीबद्दल दोन दिवसांनंतर मी बोलणार आहे, आपली भूमिका मांडणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपीनाथ पडळकर यांनी काँग्रेसला ४० जागा देण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. आज काँग्रेस-राष्ट्रवादीचे पतन झाले आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळता येत नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही विरुद्ध भाजप-शिवसेना असेच चित्र राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.
तिहेरी तलाकच्या सुधारित कायद्यावरही त्यांनी टीका केली. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस - राष्ट्रवादीला त्यांचे कार्यकर्तेही सांभाळता आलेले नाहीत. आम्ही आमचे २८८ उमेदवार जाहीर करेपर्यंत आमची काँग्रेस आघाडीला दिलेली ४० जागांची आॅफर कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ईव्हीएम घोटाळ््याप्रकरणी केवळ स्टंट करून चालणार नाही. तो घोटाळा झाला नसता, तर लोकसभेची लढत भाजप विरूद्ध वंचित आघाडी अशीच झाली असती, असा दावा त्यांनी केला.