औरंगाबाद : परतीच्या पावसाने आठवडाभरात मराठवाड्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. मात्र, आता हा पाऊस कोकण आणि गोव्याच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत तो मराठवाड्यातून काढता पाय घेईल, अशी शक्यता एमजीएमच्या अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविली आहे.भीषण दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा मराठवाड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. विभागात परतीचा पाऊसही आठवडाभर ठाण मांडून होता. मात्र हा पाऊस पुढे सरकला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातून परतीचा पाऊस काढता पाय घेण्याची शक्यता असल्याचे डॉ. औंधकर यांनी सांगितले. ते म्हणाले, दोन दिवसांत विभागात नांदेड, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस पडेल. त्यानंतर मात्र यंदाचा पावसाळा संपणार आहे. दोन दिवसांत औरंगाबाद, जालना भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी कोकण किनारपट्टी भागात मात्र हा पाऊस आणखी काही दिवस पडत राहील. दरम्यान, हवामान खात्यानेही ९ आॅक्टोबर रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय १० आॅक्टोबर आणि ११ आॅक्टोबर रोजीही मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
दोन दिवसांत पाऊस घेणार मराठवाड्यातून काढता पाय
By admin | Published: October 09, 2016 12:52 AM