औरंगाबाद: विविध ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या उत्तरप्रदेशातील दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी रामनगर येथे सोमवारी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ३४ बॅटऱ्या आणि चोरी करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली.
रिजवान शहानाजुदिन(वय २६) आणि जलालुदिन बीरबल( वय २२,रा.कामरूदिननगर, मढियाई, जि.मेरठ, उत्तरप्रदेश)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, रामनगर येथे घर किरायाने घेऊन राहणारे दोन जण कारमधून बॅटऱ्या आणून घरात ठेवतात,अशी माहिती खबऱ्याने मुुकुंदवाडी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलीस निरीक्षक यू.जी.जाधव यांच्यामार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस क र्मचारी कैलास काड, असलम शेख, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार, विकास गायकवाड, सोमकांत भालेराव, सुधाकर पाटील यांनी आज १५ जुलै रोजी दुपारी संशयिताच्या घरावर धाड टाकली.
यावेळी आरोपी राहत असलेल्या खोली बॅटऱ्यांनी भरलेली दिसली.आरोपींच्या घरासमोर उभी असलेल्या कारमध्येही काही बॅटऱ्या होत्या. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली तेव्हा ते उडवा,उडवीची उत्तरे देऊ लागले. आम्ही जून्या बॅटऱ्या खरेदी करण्याचा व्यवसाय करतो,असे ते पोलिसांना सांगू लागले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अंबड आणि बिडकीन परिसरातील मोबाईल टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरल्याचे सांगितले. आरोपींना अटक करून ३४ बॅटऱ्या आणि कार असा सुमारे ३ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपी आंतरराज्यीय चोरअटकेतील दोन्ही बॅटरीचोर उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. एका मोबाईल टॉवरला सुमारे पंधरा ते वीस बॅटऱ्या असतात. ग्रामीण भागातील मोबाईल टॉवर्स जंगलात असतात. शिवाय या टॉवर्सच्या सुरक्षेसाठी मोबाईल कंपन्याकडून विशेष काळजी घेतली जात नसल्याची संधी चोरटे साधतात आणि बॅटऱ्या पळवितात. आरोपींविरोधात विविध राज्यात गुन्हे दाखल असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.