औरंगाबाद : शहरात येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांसाठी दोन इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस मार्च अखेरपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस खरेदी करण्याची सूचना केली होती. मुंबई महापालिकेने डबलडेकर बसेस खरेदी केल्या. त्याची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले होते. मुंबई मनपाने ९०० डबल डेकर बसेस खरेदीची निविदा काढली असून टप्प्याटप्प्याने बसेस मिळणार आहेत. तसेच स्मार्ट सिटीने बसेस खरेदीची तयारी केली असली तरी दीड वर्षाची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाण्डेय यांनी पर्यटनमंत्र्यांना डबल डेकर बसेस मिळण्यास येणारी अडचण निदर्शनास आणून दिली. स्मार्ट सिटीने दोन कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांनी कमीत कमी दोन डबल डेकर बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मार्च महिन्यात दोन डबल डेकर बसेस मिळतील, अशी अपेक्षा पाण्डेय यांनी व्यक्त केली. या बसेस प्राधान्याने पर्यटकांसाठी वापरण्यात येतील.
मालमत्ता कर वाढीबद्दल चर्चा करणारदरवर्षी महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जातो. २० फेब्रुवारीपूर्वी मालमत्ता कराबद्दल निर्णय घ्यावा असा नियम आहे. यासंदर्भात पाण्डेय म्हणाले की, सध्या कोरोना कमी होत आहे. सर्व व्यवहार सुरू होत आहेत. मागील काही वर्षांपासून महापालिकेने करवाढ केलेली नाही. मालमत्ता कराची आतापर्यंत १२४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. करवाढीबद्दल पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली जाईल. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.