उस्मानाबाद : साठा फलक नसणे, मालाची पावती न देणे, जादा दराने धान्य विकणे यासह विविध कारणांवरून जिल्ह्यातील दोन रेशन दुकानांची अनामत जप्त करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यात कळंब व वाशी तालुक्यातील प्रत्येकी एका दुकानाचा समावेश आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खोंदला येथील स्वस्त धान्य दुकानदार आबासाहेब अर्जुन मुळीक यांच्याविरुध्द सुधाकर मुळीक व इतरांनी तक्रार दाखल केली होती. यावरून तहसीलदारांनी केलेल्या चौकशीअंती सदरील दुकानदारांने रास्त भाव दुकानात साठा फलक लावला नाही, काही शिधापत्रिकाधारकांना मालाची पावती दिली नाही तसेच दिलेल्या पावतीवर दिनांक नाही, आदी बाबी उघडकीस आल्याचा अहवाल त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केला. याबाबत आबासाहेब मुळीक यांनी सादर केलेला खुलासाही अमान्य करीत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या दुकानाची संपूर्ण अनामत जप्त करून परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, याच दुकानाची गतवर्षीही अनामत जप्त करून संधी देण्यात आली होती. वाशी तालुक्यातील शेंडी येथील दुकानदार भास्कर बाबूराव वीर यांच्या विरूध्दही बाबाहारी शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत वीर हे ठरवून दिलेल्या किंमतीत धान्य देण्यास टाळाटाळ करुन निर्धारित किंमतीपेक्षा जादा दराने पैसे घेतात, कार्डधारकास मारहाण केली आहे, आदी बाबी समोर आल्या. तहसीलदारांनी पाठविलेल्या अहवालावरून जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे यांनी वीर यांच्याही दुकानाची अनामत जप्त करीत परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
दोन रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द
By admin | Published: June 22, 2014 11:16 PM