सिल्लोड (औरंगाबाद ): वाळू वाहतूक अडवून चालकास धमकावून ५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना सिल्लोड पोलिसांनी बोरगाव फाटा येथे आज पहाटे रंगेहाथ पकडले. अमित लालखा तडवी ( रा.गोंदेगाव ता.जामनेर हल्ली मुक्काम सातारा परिसर औरंगाबाद ) आणि आसिफ कौसर तडवी ( रा.कासली ता.जामनेर हल्ली मुक्काम टीव्ही सेंटर पोलीस चौकीच्या पाठीमागे औरंगाबाद ) असे अटकेतील तोतया पोलिसांची नावे आहेत. तर खंडणी वसूल करण्यात मदत करणारा युट्यूब चॅनलचा तथाकथित पत्रकार फरार आहे.
तालुक्यातील बोरगाव फाटा येथे बुधवारी पहाटे अमित तडवी आणि आसिफ तडवी हे दोघे पोलिसांचा वेशात उभे होते. त्यांनी वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर अडवले. आम्ही पोलीस आहोत, ५ हजार रुपये दे नसता ट्रॅक्टर जप्त करू, तुला ठाण्यात सडवून टाकू, अशी धमकी दोघांनी दिली. चालकाकडून पैसे उकळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोन्ही तोतया पोलिसांना रंगेहाथ पकडले.
दरम्यान, खंडणीसाठी एका यु ट्यूब चॅनलच्या तथाकथित पत्रकाराने मदत केल्याचे समोर आले आहे. त्याच्या विरुद्धही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात युट्युब चॅनलचा तथाकथित पत्रकार सद्दाम मुलतानी ( रा.तांडाबाजार ता.फुलंब्री) याने मदत केल्यचे पुढे आले आहे. पोलीस सद्दामचा शोध घेत आहेत.