गंगापूर/लासूर स्टेशन/सोयगाव: तालुक्यातून गेलेल्या छत्रपती संभाजीनगर-नांदगाव मार्गावरील दिवशी पिंपळगाव शिवारात नाला बंद केल्याने शेतात साचलेल्या पाण्याच्या त्रासाला कंटाळून माजी सरपंच असलेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी दिवशी पिंपळगाव येथे उघडकीस आली. अरुण भाऊसाहेब वावरे (वय ५८ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
दिवशी पिंपळगाव या गावाला लागूनच असलेल्या गट क्रमांक १६० मधील शेतात अरुण वावरे हे कुटुंबीयासह वास्तव्यास होते. बुधवारी रात्री घरी आगमन झालेल्या गौरीचे पूजन करून ते नेहमीप्रमाणे कुटुंबीयासह झोपी गेले व गुरुवारी पहाटे पाच वाजता आंघोळ करून त्यांनी देवदर्शन घेतले. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास घराच्या समोर असलेल्या छताच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह लहान भाऊ संजय वावरे यांना आढळला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून अरुण वावरे यांना मयत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. शिल्लेगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दुपारी १ वाजता अरुण वावरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी, सासू, असा परिवार आहे.
शेतात साचलेल्या पाण्यामुळे होते चिंतितमयत अरुण यांची छत्रपती संभाजीनगर-नांदगाव मार्गाला लागून दिवशी पिंपळगावच्या जवळच गट क्रमांक १६० मध्ये सामायिक शेती आहे. महामार्गाच्या खालून टाकलेला नालापाइप दुसऱ्या बाजूने दाबल्याने पावसाचे पाणी वावरे यांच्या शेतात साचत होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी मयत वावरे यांचे भाऊ संजय वावरे यांनी प्रशासनाकडे मागणी केल्याने प्रशासनाने पंचनामा केला. त्यानुसार तहसीलदारांनी ३ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यास पत्र दिले होते; परंतु त्यानुसार कारवाई केली नसल्याने हताश झालेल्या अरुण वावरे आत्महत्या केल्याची कुटुंबीयांनी सांगितले.
अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्याअतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने नैराश्याने सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली. उपचारदरम्यान गुरुवारी पहाटे ५ वाजता या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भारत शेषराव लव्हटे (वय ३७ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गलवाडा शिवारात गट क्र. ९९ मध्ये भारत शेषराव लव्हटे यांची दोन एकर शेती आहे. या भागात १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे लव्हटे यांच्या शेतातील कपाशी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले होते. त्यांनी पेरणीसाठी दीड लाखाचे कर्ज काढले; परंतु अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने ते चिंतेत होते. याच विवंचनेत त्यांनी बुधवारी रात्री ११ वाजता घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब नातेवाइकांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.