कन्नड/पिशोर (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड तालुक्यात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा शिवारात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा बेपत्ता आहे.
कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंजना नदीच्या उपनद्या असलेल्या इसम, कोळंबी, भारंबा आदी नद्यांनाही मोठा पूर आला होता. या पावसामुळे शनिवारी रात्री भारंबा शिवारातील ओढ्याला पूर आल्याने पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. कन्नड तालुक्यातील जैतखेडा व साळेगाव बीटमध्ये कार्यरत असलेले राहुल दामोदर जाधव (३०, रा. सिंदखेडराजा) व अजय संतोष भोई (रा. शिरपूर, जि. धुळे) हे दुचाकी क्रमांक (एमएच-१८ एबी-४२९३) वरून पिशोरकडे येत होते. भारंबा तांड्याच्या पुढे आल्यावर नदीला पूर आलेला होता व पाणी पुलावरून वाहत होते. पाण्याचा अंदाज न घेता दुचाकी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु प्रवाह जास्त असल्याने तोल जाऊन पडल्याने दुचाकीसह दोघेही पाण्यात वाहून गेले.
रविवारी सकाळी काही नागरिकांना दुचाकी पडल्याचे दिसून आले. ही माहिती पिशोर पोलिसांना देण्यात आली. सपोनि. जगदीश पवार, उपनिरीक्षक एन.वाय. अंतरप, पोना. कैलास वाघ यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गावातील नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता एका व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. ओळखपत्रावरून तो राहुल दामोदर जाधव यांचा असून, ते वनरक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेतली असता सोबत अजय संतोष भोई हे वनरक्षकसुद्धा त्यांच्या सोबत असल्याचे समजले. पोलीस, वन विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी भोई यांचा नदीपात्रात नऊ किलोमीटरपर्यंत शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. शेवटी अग्निशमन विभागाच्या पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोध घेऊनही त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. रात्री पावसाची रिमझिम सुरू झाल्याने व अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना काही माहिती मिळाल्यास तात्काळ कळविण्यास सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, राहुल जाधव यांचे पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत राहुल जाधव हे दोन वर्षांपासून, तर बेपत्ता अजय भोई हे पंधराच दिवसांपूर्वी जैतखेडा व साळेगाव बीटवर रुजू झालेले होते. भोई यांचे शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरच्या लोकांशी मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यांनी ड्यूटीवरून दोघे सोबत निघाल्याची माहिती दिली होती, असे सपोनि. पवार यांनी सांगितले.