पैठण : शहरात मटका नावाच्या जुगाराचे जाळे विणून पोलीस कारवाई पासून सातत्याने दूर राहणाऱ्या पैठण शहरातील मटक्याच्या प्रमुख सुत्रधारावर गुरूवारी रात्री पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांच्या दोन बुकींना अटक केल्याने अवैध धंदे करणाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी कारवाई सुरू करताच शहरातील मटका बुकी व सुत्रधार भूमिगत झाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या सुत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.
गुरुवारी रात्री पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक छोटुसिंग गिरासे, रामकृष्ण सागडे, मनोज वैद्य, एडके, सोनार, व महिला पोलीसांचा ताफा घेऊन बसस्थानक व पिठुंबरा गल्लीतील मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान मटक्याचे आकडे लिहून घेणारा सोमनाथ गुजाराम सोळुंके रा भिलवाडा व गोकुळ मानसींग भवरे रा. रोहिदास नगर हे दोन बुकी मटक्याच्या साहित्यासह पोलीसांच्या हाती लागले. तर आबेद कासम पठाण व आशिक आयुब पठाण हे सुत्रधार मात्र पोलीसांची चाहूल लागताच फरार झाले.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज वैद्य यांच्या फिर्यादीवरून आयुब मेहबुब पठाण, गोरख भावसिंग लिंबोरे, सोमनाथ गुजाराम सोळुंंके, आबेद कासम पठाण व आशिक आयुब पठाण यांच्याविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाईत नेहमी रोजंदारीवर काम करणाऱ्या बुकीवर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. मात्र गुरूवारी मटक्याच्या प्रमुख सुत्रधारावर कारवाई केल्याने पैठण शहरात पोलीसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार झालेल्या सुत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. प्रसंगी कठोर कारवाई करण्यात येईल असा ईशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे. नागरिकांनी थेट पोलीस निरीक्षक पवार यांना मोबाईल करून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले आहे.